ज्ञानरचनावाद

                   

रचनावाद म्हंजी काय रे भाऊ?



आपल्या देशातल्या औपचारिक शिक्षणाचा इतिहास साधारण दोनेकशे वर्षांचा आहे. ब्रिटीशकाळात मेकॉलेने(१८३५) इथल्या शिक्षणाला औपचारिक चौकट दिली. त्याआधी परंपरेने चालत आलेले शिक्षण इथे सुरु होते. शिक्षणाचा प्रसार-प्रचार झाला. महत्त्व पटल्याने प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाचा टप्प्याटप्प्याने विस्तार होत गेला. या काळात शिक्षणात निरनिराळे प्रयोग झाले. काळ बदलतो तसे शिक्षण बदलते. सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतलाय. बालशिक्षणाची दिशा स्पष्ट करणारा २००५चा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, २००९साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा, त्यातल्या निरनिराळ्या तरतुदी, त्यानुसार होणारे निर्णय... वर्तनवादी शिक्षण पद्धतीकडून रचनावादाच्या दिशेने सुरु झालेला प्रवास... एकूणच शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीने सध्याचा काळ संक्रमणाचा काळ आहे. नव्याने आलेल्या रचनावादाचा कितीही बोलबाला सुरु असला तरी इथले वास्तव अजूनही वर्तनवादीच आहे, हे कसे बरे नाकारता येईल?
शिक्षणासारख्या जनसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या, मुलभूत क्षेत्रात क्रांतिकारक ठरू शकतील, असे हे बदल आहेत. हे मान्यच करावे लागेल. मात्र एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या या बदलांनी एकूणच शिक्षणविश्वात भांबावलेपण आलेले दिसतेय. या बदलांचे स्वागत करतानाच ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते, असे वाटत राहते. आता हे बदल अंगावर आलेतच तर मग आता किमान त्यांना सामोरे जाण्यासाठी समाजमन घडविण्याचे काम आगामी काळात सरकार आणि शिक्षणक्षेत्रातील धुरिणांना करावे लागणार आहे. त्यासाठी लोकशिक्षणाला पर्याय नाही.
नव्याने आलेल्या बदलांविषयी बोलण्याआधी पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. १९१२ साली जे. बी. वॉटसन नावाच्या अमेरिकन मानसशास्रज्ञाने वर्तन प्रक्रियेचा अभ्यास करून वर्तनवादाची मांडणी केली. मानसशास्र वर्तनाचे शास्र आहे, असे त्याचे मत होते. वर्तनवादाचा जनक वॉटसन मूलत: प्राणीशास्रज्ञ होता. तो परिस्थितीवादी होता. व्यक्तीच्या जडणघडणीत परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा असतो असे त्याचे आग्रही मत. ' कोणतेही नवजात अर्भक माझ्या हाती द्या. विशिष्ट परिस्थिती निर्माण करून त्यातून मी मिल्टनसारखा श्रेष्ठ कवी सहज घडवू शकेन ', असे उद्गार वॉटसन काढलेले आहेत! हे इथे मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहे!
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला वॉटसन महाशयांच्या या विचारांनी जगभरातल्या अनेक मानसशास्रज्ञांना आकर्षित केले. एकूण कार्याचा विचार करता वर्तनवादी संप्रदायाने मानसशास्रात जशी एकप्रकारची क्रांती घडवून आणली, तशी शिक्षणाच्या परिणामकारकतेतही मोठी भर घातली. शिक्षणातल्या अध्ययन प्रक्रियेचा सखोल विचार करण्याचा प्रयत्न वर्तनावादाने केलाय. किंबहुना काल-परवापर्यंत वर्तन-परिवर्तन हेच शिक्षणाचे खरेखुरे उद्दिष्ट मानले जात होते. विद्यार्थ्यांच्या मन:स्थितीचा निष्कारण बाऊ न करता त्यांच्या शारीरिक वर्तनावर नियंत्रण ठेऊन शिकण्याची प्रक्रिया घडवून आणणे सहज शक्य आहे, हे शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मनावर वर्तनवादाने बिंबवलेय.
वास्तविक वर्तनवादाच्या (Behaviourism) मांडणीच्या दरम्यान एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या मानसशास्रज्ञांनी रचनावाद (Structuralism), कार्यवाद (Functionalism), साहचर्यवाद (Associationism), मनोविश्लेषणवाद (Psychoanalysm), हेतुवाद (Purposivism), समष्टीवाद (gestallism) वेगवेगळे पाश्चात्य संप्रदाय उद्याला आले होते. मानसशास्राच्या अंगाने शिक्षणाचा विचार करण्याचे ते दिवस असल्याने या सगळ्या संप्रदायांचा कमी अधिक प्रमाणात परिणाम शिक्षण प्रक्रियेवर होत होता. तसा तो आजही होतो आहेच.
परिस्थितीच विद्यार्थ्यांना विशिष्ट वर्तन करायला भाग पाडते. एखाद्या व्यक्तीची सामाजिक, कौटुंबिक, शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन उपक्रमांचे आयोजन करावे. अज्ञात, अमूर्त मनावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वर्तन करणारे शरीर, त्या वर्तनाला चेता पुरविणारी परिस्थिती यांचा विचार शिक्षणाने करावा, असा वास्तवमार्ग वर्तनवादाने शिक्षणाला सुचविला. तो स्वीकारलाही गेला. पुढे त्याची एक पोलादी चौकट तयार झाली. तिच्या अनेक मर्यादा होत्या. विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर युरोप-अमेरिकेत शिक्षण पद्धतीचा पुनर्विचार सुरु झाला. स्व-तंत्र विचार करण्यास प्रवृत्त करणारी ज्ञानरचनावादी पद्धती (Constructivism)आली. वर्तनवाद म्हणजे 'मुलांच्या वर्तनात अपेक्षित बदल होणे म्हणजे शिक्षण', असे मानणारी विचारसरणी. मूल म्हणजे चिखलाचा गोळा! मूल म्हणजे कोरी पाटी! असे जॉन लॉक नावाच्या मानसशास्रज्ञाने सांगून ठेवलेय. शिक्षक हाच ज्ञानाचा स्रोत असतो. केवळ तो शिकवतो म्हणून मुलं शिकतात, असे मानणारे हे तत्त्वज्ञान.
ही मांडणी कालसुसंगत असेलही. पण मुलांना मात्र मोठ्या हायरारकीतून जावे लागे. कविता तोंडपाठ म्हणा. पाढे घोका. स्पेलिंग पाठ करा. व्याकरणाचे नियम स्मरणात ठेवा. व्याख्या लिहा... काय काय करावे लागे. डोक्यात माहितीच्या थप्प्या लावायच्या. परीक्षा नावाच्या भितीग्रस्त, प्रचंड शिस्तबद्ध वातावरणातल्या प्लॅटफॉर्मवर सारे खाली करायचे. हुं नाही की चू नाही! परीक्षा म्हणजे व्यवस्थेने आमच्याविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे, असे मुलांना वाटू लागले! परीक्षांचा अतिरेक झाला. मुलं केवळ परीक्षार्थी बनली. 'समज' विकसित होण्यापेक्षा 'टक्के म्हणजे पक्के' असा समज रूढ झाला. या सगळ्यात स्मरणाला नको इतके महत्त्व होते. फक्त 'हुशार' मुलांना पुढे नेणारी शिक्षण पद्धती अशी टीका होऊ लागली.
समाजातल्या उतरंडीत स्मरणशक्ती ज्या वर्गातल्या मुलांचे भांडवल नव्हते, अशा मुलांना हे फार जड जात असे. त्यातून अनेक मुलं शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकली गेली असतील, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे तेव्हा शिक्षण पद्धतीवर वर्तनवादाचा वरचष्मा होता. वर्तनातील बदलांच्या अंगाने यश-अपयश तपासले जाई. पुढे हावर्ड गार्डनने मेंदूचे विश्लेषण करून बहुविध बुद्धीमात्तांचा सिद्धांत मांडला. मेंदू हाच शिकण्याच्या प्रक्रियेतला महत्त्वाचा अवयव आहे, बुद्धिमत्ता एक नसून अनेक प्रकारच्या असतात, असे त्याने ठामपणे सांगितले. पुढे काळानुरूप शिक्षणाचे संदर्भ बदलत गेले. वर्तनवाद म्हणजे जनावरे कसे शिकतात, हे सांगणारे शास्र आहे, याची सत्यता आता आता आपल्याला पटू लागली. तोपर्यंत म्हणजे अगदी काल-परवापर्यंत कुत्री, उंदीर, कबुतरे अशा प्राण्यांवर केलेले प्रयोग मुलांवर करीत राहिलो!
शिक्षण ही निरंतर बदलत जाणारी प्रक्रिया आहे. समाज बदलतो तसे शिक्षणही आपली कुस बदलत जाते. अलीकडच्या काळात जगभर जी काही संशोधनं झाली. त्यातून शिक्षणात नवे प्रवाह आले. शिक्षणात आधीचा वर्तनवादी विचार मागे पडतो आहे. नव्या संदर्भासह नवी ज्ञानसंरचनावादी (constructivism) विचारसरणी उद्याला आलीय. जीन पियाजे(जर्मनी) आणि वायगोटस्की या दुकलीने याविषयी प्रचंड मोठे काम केले आहे. मुलभूत संशोधन आणि प्रयोगांनंतर जगभरातल्या ठिकठीकाणच्या समुदायांनी या विचारसरणीचे स्वागत केले आहे. १९२५च्या सुमारास या ज्ञानरचनावादी विचारसरणीचा उदय झाला. १९५०च्या आसपास युरोप आणि पुढे १९७०च्या दरम्यान अमेरिकेसह जगभरातल्या इतर देशांत या तत्त्वानुसार बालशिक्षण सुरु झाले. गेल्या काही वर्षांपासून आपणही ज्ञानसंरचनावादी विचारसरणीकडे वळलो आहोत. सरकारी पातळीवर स्वीकार होण्याआधी काही प्रयोगशील शाळांतून या तत्त्वानुसार काम सुरु होते. २००५ साली नवी दिल्ली येथील आपल्या देशातल्या राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (NCERT) तज्ज्ञांच्या मदतीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला. देशातल्या शिक्षणाची एकूणच दिशा स्पष्ट करणारा, शिक्षण कशासाठी, कसे असावे यामागील भूमिका सांगणारा तो अधिकृत सरकारी दस्ताऐवज आहे. रचनावादी विचारसरणी हा या सगळ्याचा गाभा आहे.
नव्याने आलेला ज्ञानरचनावाद म्हणजे काय आहे तर मूल कसं शिकतं? याचा सर्व अंगांनी शास्रीय अभ्यास करून केलेली ही मांडणी आहे. मुलं स्वतंत्र विचार करतात. मुलांचे शिकणे केवळ शाळेत नाही; तर घर, परिसर, समाज असे सगळीकडे होते. स्वतःच अनुभवातून ती शिकतात. शिकणे सतत सूरू असते. मुलांची प्रत्येक कृती म्हणजे ज्ञानाचा स्रोत असते. (Every child's every act is the source of knowledge.) मुलं स्वतः ज्ञानाची निर्मिती करतात, यावर विश्वास दाखवणारे हे तत्त्वज्ञान आहे. मुलांचे जीवन आणि शिक्षण वेगळे करता येत नाही. मात्र त्यांचा मेळ घालायला हवा. जीवनाशी शिक्षण जोडण्यासाठी शिक्षणात मुलांचे सांस्कृतिक भांडवल (Cultural Capital)) वापरले पाहिजे. अशा अध्ययन अनुभवांची, कृतींची रेलचेल असली पाहिजे. यावर ज्ञानरचनावादाचा मुख्यत्वेकरून भर आहे. शिक्षण क्षेत्रात सध्या हे नवे वारे वाहत आहेत.
२००९साली आलेल्या शिक्षण हक्काच्या कायद्यामुळे परीक्षांचे महत्त्व काहीसे कमी झालेय. 'मार्क्सवादा'च्या कचाट्यातून आणि परीक्षांच्या ताणातून बालशिक्षण बाहेर आणलेय, हे बरे झाले. कठोर परीक्षांऐवजी सध्या वर्षभर मुलांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (Comprehensive And Continuous Evaluation) सुरु आहे. केवळ पेपर लिहून पास होणे नाही, तर निरनिराळ्या तंत्रांनी मुलांच्या शिकण्याच्या नोंदी घेतल्या जाताहेत. आठवीपर्यंत गुणांऐवजी श्रेण्या दिल्या जात आहेत. मुलांना व्यक्ती म्हणून समजून आणि सामावून घेणारा, त्यांच्या विश्लेषक वृत्तीला पोषक बालस्नेही दृष्टीकोन शिक्षणात आलाय. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेचे एका अर्थाने लोकशाहीकरण होण्यास मदत होतेय.
इथे एक गोष्ट लक्षात आणून द्यायचीय. ती म्हणजे कोणतीही जुनी व्यवस्था त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या बहूतेक घटकांच्या अंगात पक्की मुरलेली असते. त्यामुळे एखादा कायदा आला. अध्यादेश निघाला म्हणून रात्रीत आधीची व्यवस्था बदलता येत नाही. पण पाश्चात्य लोकांचे अंधानुकरण करण्यात आपण भलते पटाईत आहोत. कुठे काही प्रयोग झाले की, वाहवा होते. आपल्या मनाला त्याची भुरळ पडते. खरे तर जग आपल्याला तुम्ही भारी आहात, असे म्हणत असते. आपण मात्र भलत्याच्याच मागे धावत असतो! शहामृगाजवळील कस्तुरीसारखे!!
एक मात्र खरेय की, आधी म्हटल्याप्रमाणे एका पाठोपाठ एक असे अत्यंत वेगाने आलेल्या बदलांनी शिक्षणविश्वात भांबावलेपण आणलेय. म्हणूनच एकीकडे या बदलांचे स्वागत करताना ते अतिशय काळजीपूर्वक, संयमाने लागू करायला हवे होते असे वाटते. इथला समाज, प्रादेशिकता, संस्कृती त्यातील व्यामिश्रता, गुंतागुंत, लोकांच्या जगण्यातले वैविध्य, शाळांतील सोयीसुविधा, एकूणच शैक्षणिक पर्यावरणावर परिणाम करणारे सारे घटक विचारात घ्यायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. सत्तेला वाटते अमुक एक गोष्ट आम्ही ठरवली की ती झाली पाहिजे. बस्स!! असे मोठे धोरणात्मक बदल एक तर लादलेले असतात किंवा ते कुणाचे तरी अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीतून येत असतात. पण असे करताना ज्यांच्या खांद्यावर तो डोलारा उभा आहे त्यांना ते बदल खरेच झेपू शकतात काय, याचाही विचार होणे महत्त्वाचे ठरते.

No comments:

Post a Comment